गुरुवार, ऑक्टोबर ०६, २०११

अशी मुंबई !! तशी मुंबई !!!

             


              मुंबई आमची फक्त नावाची नाही तर अस्सल मुंबई आहे. रोज रोज वाचता ते नाही सांगत आहे काही मी!! अरे गैरसमज नको म्हणून म्हंटले.. परवा आमच्या घरी एक पाहुणे आले, आपले अक्खे कुटुंब घेवून (मुंबईकर आहे.) मग आमच्या घरात आदरातिथ्य घेताना पाहुण्या काकी मध्येच बोलल्या,"क्कॉय बाईSईSS उकडत इथे शी!!! कसला बकाल प्रवास ग हा !!! कस बाई जमत हो तुम्हाला? आता काय म्हणायचं त्यांना पण आपली सवय म्हणजे सवय. नाव ठेवलय तर उत्तर नको का द्यायला? मग देवून टाकले उत्तर, "मग मुंबई आहेच घड्याळाची भागीदारीण आळशी नै कै"!!!, असे किस्से रोजच घडत असतात बघा, मागे आमच्या ऑफिसात एक नवीन पोरग भरती झाल.... अगदी नवख हो मुंबईसाठी. ते असो, आधीच नवीन भरती नंतर मुंबईची काही माहिती नाही पण तरीही रात्रपाळीत पहिला प्रश्न विचारला तो पण इथे पब कुठे असतात. अश्या बऱ्याच गमती जमती घडतंच असतात. पण मुंबई म्हणजे सौंदर्याची खाण, तरुणाईची शान अन बेफाम जगण्याचा आनंद... वैगेरे वैगेरे
               मुंबईत आल्यावर कुणाच लक्ष असत ते घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांवर, तर कधी लक्ष जात लाईफ-लाईन ठरलेल्या रेल्वे वर, कधी लक्ष केंद्रित होत ते अफाट किनारी धडकणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर किंवा अंगी रुजलेल्या भिन्न विभिन्न अश्या शैल्लींवर, अनुभव आला कि समजते. आणि नाहीतरी मुंबईवर कित्ती तरी वाक्ये प्रसिद्ध आहेत, जी मनाला भिडतात त्यातल एक म्हणजे "मुंबईत कधी कुणी उपाशी मरत नाही." पण खरच ह! मुंबई म्हणजे अर्ध विश्व आहे इथल्या लोकांसाठी... भ्रष्टी लोक, कष्टी लोक, आनंदी लोक, दु:खी लोक, वेडी लोक, खुळी लोक, गरीब लोक, श्रीमंत लोक, भिकारी लोक, दानी लोक, अभिमानी लोक लिहिता लिहिता अजून एक ब्लॉग बनेल इतकी लोक इथे गुण्या गोविंदाने नांदत असतात. अस चित्र तर दिल्लीत पण दिसत नसेल. वैर असो किंवा मैत्री असो, प्रेम असो किंवा माया असो सर्व काही पुरेपूर भरलेले, तशी मुंबईची व्यावहारिकता सुद्धा वाखाणण्याजोगीच, ती कुणी पहिली आहे कि नाही ते माहिती नाही पण मुंबईला आपण कुठल्या नजरेने पाहतो हे महत्वाचे आहे. आपण मुंबई तर फिरलाच असाल, बरंच काही भेटेल वाचण्यास मुंबई बद्दल परंतु याची देही याची डोळा तिचा अनुभव घेताना मिळणारा आनंद काही औरच आहे. मुंबई माहिती आहे तुम्हाला म्हणजे तीन दिशांनी पाण्याने वेढलेला भू-भाग म्हणून किंवा अजून काही अजून काही तसेच अनंत अश्या गोष्टींनी नटलेली वैगेरे वैगेरे, पण खर तर मुंबई फक्त पाण्याने वेढलेली नाही तर अजून काही गोष्टींनी वेढलेली आहे. त्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि थरारक गोष्टी सुद्धा आहेत बर का! म्हणजे माझा दृष्टीकोन वेगळा आहे मुंबईकडे पाहण्याचा इतकंच. आणि हो मित्रांनो राग नका मानू पण मला तर बाबा फारच गर्व आहे मुंबईचा, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा हे नित्याचेच आहे. पण त्यापरत्वे जावून मी मुंबईचा मुंबई माझी हे बोलतांना खूप वेगळेपण जाणवते.
               मुंबई देशाची आर्थिक राजधानी असो किंवा महाराष्ट्राची मुख्य राजधानी असो पण एक महत्वाचे म्हणजे मुंबई सर्वांचीच झालेली आहे.(भावनावश), मतभेद, जातीभेद वैगेरे त्यांच्या त्यांच्या जागी पण इथली माणुसकी ५,५ गल्ल्या सोडली कि बदलणारी, एक उदाहरण अस आहे कि जेव्हा मी कामानिम्मित रात्री किंवा दिवसा बाहेर पडतो तेव्हा मुंबईच्या १०० स्वभावांचे दर्शन होते. दिवसा एक एक क्षण मोजून वापरणारी तर रात्री मोजून मोजून एक एक क्षण घालवणारी, तेव्हा माझ्या मनात असंच आले कि मुंबईला तर श्वास घ्यायलाही वेळ नाही. तिची कार्यक्षमता तिची जशी दिवसा तशीच रात्री पण असते. राजकारणांत गुरफटून सुद्धा स्वतःची ओळख शाबूत ठेवणारी, सामजिक घटकांना एकत्र जपून ठेवणारी आणि आर्थिक उलथापालीत स्वतःचा झेंडा नेहमी वर ठेवणारी अशी माझी नामवंत मुंबई. साधारण जगणे, असाधारण वागणे, परिचित असणे, अपरिचित राहणे. कस जमत असाव तिला हे समजण्यापलीकडे हो, तसेच तिचे रक्षक जितके तितकेच भक्षक पण आहेत. जसा तिचा दिवस रंगबेरंगी आणि असंख्य सणांच्या रणधुमाळीने सजतो. तशी रात्र सुद्धा उच्चभ्रू काय आणि निश्चभ्रू काय सारखीच ताणून रंगते. नाट्यमय जीवन जगणे फक्त मुंबई शिकवू शकते हो.... वैशिष्ट्यपूर्ण पण चकवेदार अश्या जीवनशैलीचे रंग भरलेली आहे. कौतुक करायला जशी पुष्कळ जागा आहे न तिच्याकडे तशीच निंदा करण्यास हि मुबलक मु.भा. आहे बर का! आणि ती सुद्धा होतेच. मुंबई म्हणजे मुंबई नाही तर अष्टपैलू जीवन जगणारी आणि जगवणारी एक कलावंतीण आहे. जिच्यात अमेरिका सुद्धा दिसते आफ्रिका सुद्धा दिसते आणि भारत सुद्धा दिसतो. 
                मुंबईच्या ठळक बातम्या, मुंबईच्या विशेष घडामोडी, मुंबईच्या वास्तवदर्शी आणि अविश्वसनीय कथा जेव्हा कानी पडतात तेव्हा प्रत्येकाच्या मनात विचित्र विचारांचे घर नक्कीच होते. मुंबईला विनम्रतेने सुख भोगण्याची जशी सवय आहे तशीच उभ्या डोळ्यांनी स्वतःचा जीव जळतांना पाहण्याची सुद्धा सवय आहे. तिच्यासाठी विश्वात काय जागा असेल ते माहिती नाही पण प्रत्येक मुंबईकरांच्या मनात तर खूप आदर आहे हे नक्की, किती तरी घटनांचा आढावा घेतला तरी असे वाटतच नाही कि काही अनभिशिज्ञ असे काही घडले आहे. जसे कधी सकाळी जिथे कुठला छोटासा अपघात दिसतो. संध्याकाळी तिथे नेहमीसारखी वर्दळ असते. सकाळी ज्या गल्ल्यांमधून भांडणे, कलह ऐकू येतात तिथे संध्याकाळी पूर्ण शांतता असते. तिला जितक्या जवळून पहावी तितके तिचे रंग निराळे होत जातात. तिचा रंग कधी दहशतवादाने लाल होतो तर कधी गणपतीच्या गुलालाने गुलाबी होतो. कधी रमजान ने हिरवा तर कधी एकत्रच रंगत न्हावून जातो. जश्या गुलाबाच्या पाकळ्या उमलातांना जितक्या सुंदर वाटतात न तितक्याच मुंबईच्या रंगांची ओळख हळू हळू आतमध्ये शिरतांना होत असते. तिची ओळख म्हणजे तिचे नाव म्हणूनच मला तर वाटते कि परदेशी नागरिक मुंबई याच कारणाने तर नाही न फिरायला येत असावेत.
                 मुंबई मुंबई करतोय खर पण तुम्हाला काय वाटत मुंबई विषयी हे सुद्धा तितकाच महत्वाच नाही का? मग वाट कसली पाहताय.प्रतिक्रिया द्या....... पुन्हा मुंबईला साद घालायची आहे.....










लेखातील अपात्र किंवा मनाला लागणाऱ्या तसेच काही अक्षम्य चुकीच्या गोष्टी वाटल्यास कृपया पोटात घालाव्यात.